सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात ज्येष्ठ सहकार नेते तथा आमदार सुभाष (बापू) देशमुख यांची दमदार एन्ट्री झाली आहे. लोकमंगल नागरी सहकारी बँकेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सुभाष देशमुख यांच्या नावाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.
सुभाष देशमुख यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी महत्त्वपूर्ण कायदेशीर पावले उचलली होती. आता सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या सक्रीय सहभागामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील समीकरणांना कलाटणी मिळाली आहे.
विभागीय सहनिबंधकांकडे पारदर्शकतेची मागणी: ठराव प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत आणि सर्व प्राथमिक सहकारी सोसायट्यांना समान मताधिकार मिळावा यासाठी आमदार देशमुखांनी सहकार खात्याकडे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे लेखी निवेदन दिले आहे. "जिल्हा मध्यवर्ती बँक ही सामान्य शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभी राहिली आहे. या बँकेवर शेतकऱ्यांच्या हिताचेच रक्षण झाले पाहिजे," असा स्पष्ट इशारा देशमुखांनी दिला.
