सोलापूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये सोलापूर शहराचा व ग्रामीण भागाचा पायाभूत विकास, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणि उद्योगवाढीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहराभोवती नियोजित रिंग रोडचे काम वेगाने पूर्ण करणे, सोलापूर-विजयपूर महामार्गावरील उड्डाणपूल आणि ग्रामीण जोड रस्त्यांचे काँक्रिटीकरण यासाठी गडकरींकडे विशेष निधीची मागणी केली. या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.
या सदिच्छा भेटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, रस्ते विकासामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला आणि कृषी माल वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे.
